फेसबुकवरची मैत्री डोंबिवलीकराला पडली महागात, लाखोंचा गंडा घालून महिला पसार
![Dombivlikara's friendship on Facebook cost him money, the women spread the money](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/Crime.png)
डोंबिवली । फेसबुकवर एका अनोळखी महिलेशी मैत्री करणे डोंबिवलीमधील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. ती व्यक्ती हॉटेलच्या रूम मधून शौचालयात जाताच महिला मैत्रिणीने दागिने, परवाना असलेले रिव्हॉल्व्हर आणि लाखोंची रोकड घेऊन तेथून पसार झाली आहे. ही घटना डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवरील कोहिनूर हॉटेलमध्ये घडली असून याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महिला आरोपी संस्कृती हिने डोंबिवली पूर्वेतील सागाव येथील रहिवासी महेश पाटील यांच्या फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्या महिलेची कोणतीही ओळख नसताना पाटील यांनी ही फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली. त्यानंतर दोघांनी एकमेकांना मेसेज केले. महेश पाटील यांनी त्या फेसबुक फ्रेंडला खोणी गावातील कोहिनूर हॉटेलमध्ये जेवणासाठी बोलावले. ती महिला हॉटेलवर येताच पाटील यांनी रूम बुक केली. त्या रुममध्ये बसून दोघेही तिथे दारू प्यायले. दरम्यान, महेश पाटील रात्री 11 वाजता लघुशंका करण्यासाठी गेले असता.
त्या फेसबुक फ्रेन्डने हीच संधी साधून त्यांचा परवाना असलेले महागडे पिस्तुल, महागडा मोबाईल, घड्याळ आणि लाखो रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा ऐवज घेवून तेथून पोबारा केला. त्यानंतर आपली फसवणूक झाली हे लक्षात येताच फिर्यादी महेश पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्या अनोळखी महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.