शरद पवारांवरील टीका भोवली; नितेश व निलेश राणेंवर गुन्हा
![Criticism of Sharad Pawar; Crime against Nitesh and Nilesh Rane](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/nitesh-and-nilesh-rane.png)
मुंबई| राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेले बेछूट आरोप आणि टीका भाजपचे आमदार नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे यांना महागात पडण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिमशी शरद पवार यांचे नाव जोडल्यामुळे नितेश आणि निलेश राणे यांच्याविरुद्ध मरीनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तेव्हा आता पोलिस पुढे काय कारवाई करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणात आमदार नितेश राणे यांना अटक झाली होती. मुंबईतील अधीश बंगल्यावर बीएमसी कारवाईची टांगती तलवार आहे. त्यानंतर आता नितेश आणि निलेश राणे यांच्यावर हा गुन्हा दाखल झाल्यामुळे राणे कुटुंबीयांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. निलेश राणे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शरद पवारांवर टीका केली होती. तर आझाद मैदानातील मोर्चात नितेश राणे यांनी शरद पवारांवर टीका केली होती. यावरून नितेश आणि निलेश राणे यांच्यावर मरिनड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हा आता या प्रकरणात पोलिस त्यांना चौकशीसाठी बोलावणार की पुढे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निलेश राणे यांनी सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन शरद पवार यांच्यावर टीका केली होती. नवाब मालिकांचा ते राजीनामा का घेत नाहीत. काही वेगळे राजकारण आहे का? शरद पवार हेच महाराष्ट्रातील दाऊदचा माणूस असल्याचा संशय मला वाटतो, असे खळबळजनक वक्तव्य निलेश राणे यांनी केले होते. यावरून निलेश आणि नितेश राणे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.