ताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील सर्व गाई म्हशींचे गोठे, तबेले मुंबईबाहेर हटवण्याच्या निर्णयाला वेग

महापालिका मुंबईतील सर्व तबेल्यांना नोटीस, सर्व गोठे दापचेरी येथे हटवणार

मुंबई : मुंबईतील सर्व गाई म्हशींचे गोठे, तबेले मुंबईबाहेर हटवण्याच्या निर्णयाला वेग येण्याची शक्यता असून मुंबई महापालिका आता मुंबईतील सर्व तबेल्यांना नोटीस बजावणार आहे. हे सर्व गोठे दापचेरी येथे हटवण्यात येणार आहेत. मुंबईत एकूण २६३ तबेले असून ते हटवण्यासाठी राज्य सरकारच्या पशुसंर्वधन आणि दुग्धव्यवस्या विभागाने पालिका प्रशासनाकडे मदत मागितली आहे. त्यानुसार पालिकेने या गोठ्यांना नोटीस बजावण्याचे ठरवले आहे.

मुंबई उपनगरात विविध ठिकाणी गाई म्हशींचे गोठे आहेत. ते मुंबई शहराबाहेर स्थलांतरीत करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने २००५ मध्ये घेतला होता. पालघर जिल्ह्यातील दापचेरी येथे ते स्थलांतरीत करण्यात येणार होते. मात्र, मुंबई दूध उत्पादक संघटनेने या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या निर्णयाच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेथेही संघटना हरली. त्यामुळे गोठे शहराबाहेर नेण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र हा निकाल येऊन तीन, चार वर्षे झाली तरी हे गोठे अजूनही मुंबईत आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने आता पालिकेकडे मदत मागितली आहे. गोठे हटवण्यासाठी राज्य सरकारच्या संबंधित विभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे पालिकेने ते हटवावे अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. त्यानुसार पालिकेने आता मुंबईतील गोठ्यांचे सर्वेक्षण केले असून त्यांना नोटीसा पाठवण्याचे ठरवले आहे, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

गोठ्यांना पाठवण्यात येणाऱ्या नोटीशीचा मसूदा तयार करण्यात आला असून त्याला आयुक्तांची मंजुरी घेण्यात येणार आहे. त्यानंतर तबेल्यांच्या जागांचेही सर्वेक्षण करून क्षेत्रफळ मोजण्यात येणार आहे.जनावरांचा मुंबईकरांना त्रास गोठ्यांतील शेण, मलमूत्र रेल्वे रुळांजवळ किंवा नदी नाल्यात सोडले जात असल्याची तक्रार अनेकदा केली जाते. तसेच जनावरे अन्नाच्या शोधात शहरातून फिरत असतात. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. अंधेरीच्या गोखले पुलावरही गायी नेणाऱ्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी अनेकदा आल्या होत्या. मोकाट फिरणारी जनावरे कचऱ्याच्या पेट्यांमध्ये तोंड घालत असल्यामुळे कचरा इतस्तत: पडतो अशा प्रकारच्या तक्रारी येतात. पालिकेचा संबंधित विभाग अशा जनावरांना पकडून कोंडवाड्यात ठेवतो. मात्र मालकांनी दंड भरून सोडवून नेल्यानंतर पुन्हा ही जनावरे रस्त्यावर दिसतात. त्यामुळे त्यावर कायमस्वरुपी उपाय करण्याची मागणी विविध स्तरातून होत होती.

प्रदूषण वाढत असल्याची तक्रार गोरेगावात मुंबईत एकूण २६३ गोठे असून सर्वाधिक गोठे गोरेगाव परिसरात आहेत. त्यापाठोपाठ जोगेश्वरी, कांदिवली, दहिसर, कुर्ला, विद्याविहार परिसरातही तबेले आहेत. त्यापैकी केवळ आरे वसाहतीतील गोठे हटवण्यात येणार नाहीत, असे अधिाकऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button