breaking-newsमुंबई

#CoronoVirus:ऑर्थर रोड जेलमध्ये 26 कर्मचारी आणि 78 कैद्यांना कोरोना

मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता विविध जेलमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. मुंबईतील ऑर्थर रोड जेलमधील 26 कर्मचारी आणि 78 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आर्थर रोडमधील कोरोनाबाधितांचा आकडा 104 वर पोहोचला आहे.

आर्थर रोड जेलच्या सर्व कोरोनाबाधितांना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णांलयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. गेल्या तीन दिवसात जेलमधील एकूण 150 कर्मचारी आणि कैद्यांची चाचणी करण्यात आली. त्याचा अहवाल टप्प्याटप्प्याने येत आहे. अजूनही काही जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

आर्थर रोड जेलमधील एका कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. या कैद्याच्या मृत्यूनंतर त्याचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याच्या संपर्कातील 6 जेल पोलिसांची कोरोना चाचणी केली असता, ते सुद्धा पॉझिटिव्ह आढळले.

यानंतर या कैद्याला 2 मे रोजी अर्धांगवायूचा झटका आला. त्यानंतर त्याला पुन्हा जे. जे रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्यावेळी त्याची स्वॅब टेस्ट घेतली असता, त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला.

यानंतर खबरदारी म्हणून हा कैदी असलेला यार्ड कंटेन्मेंट करण्यात आला आहे. तसेच या कैद्याला रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आलं. इतकंच नव्हे तर जवळपास 150 कैद्यी आणि जेल कर्मचाऱ्यांची स्वॅब टेस्टही घेण्यात आली. यापैकी तब्बल 104 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

ऑर्थर रोड जेलमध्ये 800 कैद्यांची क्षमता आहे. मात्र सद्यस्थितीत या ठिकाणी चौपट म्हणजे जवळपास 3600 कैदी आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्ण सापडणे ही प्रशासनासाठी मोठी धोकादायक बाब ठरु शकते.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात लॉकडाऊन आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कारागृहात ही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. मुंबई मध्यवर्ती कारागृह, ठाणे मध्यवर्ती कारागृह, येरवडा मध्यवर्ती कारागृह, कल्याण जिल्हा कारागृह, भायखळा जिल्हा कारागृह ही पाच कारागृह बंद ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत वरिष्ठांकडून आदेश येत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी ही पाच कारागृहे लॉकडाऊन राहणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button