#CoronaVirus: सिल्व्हर ओकवरील सहा सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/5321-1574849139.jpg)
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवरील सहाजणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलेली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण शरद पवार यांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक आहेत. सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचाऱ्यांची नुकतीच कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आलेली होती. यामध्ये या सहाजणांचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. तर काहीजणांचे अहवाल देखील प्रलंबित आहेत. त्यामुळे आता सिल्व्हर ओकवर मोठी धांदल उडालेली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या सुरक्षारक्षकांना सध्या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आलेले आहे.
सुदैवाने शरद पवार गेल्या काही दिवसांत पॉझिटिव्ह आलेल्या सुरक्षारक्षकांच्या संपर्कात आलेले नव्हते. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून पुढील काही दिवस शरद पवार यांनी कोणालाही न भेटण्याची शक्यता आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार यांना खडसावल्यामुळे सध्या पवार कुटुंबात अंतर्गत कलह निर्माण झाल्याची चर्चा रंगलेली आहे. त्यासाठी पवार कुटुंबीयांच्या भेटीगाठी सुरु आहेत. कालच शरद पवार बारामतीला जाणार होते. मात्र, ऐनवेळी शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झालेले होते. अजित पवारांशी त्यांची फोनवर सकारात्मक चर्चा झाल्याने पवारांनी बारामतीला जाणे रद्द केले आणि ते मुंबईला परतल्याचे सांगितले जात आहे.