CoronaVirus: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या 32वर; औरंगाबादेतील एक महिला कोरोना पॉझिटिव्ह
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/coronavirus-precautions1_.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राज्यात शनिवारी कोरोना (कोविड – 19) आजाराच्या चौदा नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच औरंगाबाद येथील 59 वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ती भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. यामुळे राज्यात आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 32 झाली आहे. यातील चार जण हे पुणे येथील पहिल्या दोन बाधित रुग्णांसोबत दुबई सहलीला गेलेल्या चमूपैकी आहेत.
यापैकी एक रुग्ण औरंगाबाद, एक रुग्ण अहमदनगरला, दोन यवतमाळला, तर एक जण मुंबईत भरती आहे. या पाच जणांबरोबरच मुंबईत आणखी चार जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यामध्ये हिंदुजा रुग्णालयात भरती असलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या रुग्णांची पत्नी आणि मुलगा यांचा समावेश आहे. मुंबईत आढळलेले इतर दोन रुग्ण हे 37 आणि 59 वर्षांचे पुरुष असून, त्यांचा अनुक्रमे अमेरिका व फ्रान्स आणि फिलिपाइन्स प्रवासाचा इतिहास आहे. नागपूर येथे भरती असलेला आणि कतार देशात प्रवासाचा इतिहास असलेला एक 43 वर्षीय पुरुषही कोरोनाबाधित असल्याचा अहवाल शनिवारी इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेने दिला. कोरोनाबाधित नऊ रुग्णांपैकी एक महिला आहे.
राज्यात आतापर्यंत बाधित भागातून एकूण 949 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात 663 जणांना भरती करण्यात आले आहे. शनिवारपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 538 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत, तर 26 जण पॉझिटिव्ह आहेत.