#CoronaVirus: “मुंबई तिसऱ्या स्टेजच्या उबंरठ्यावर; कम्युनिटी ट्रान्समिशन पहिल्या टप्प्यात रोखायला हवं”
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/PN28MumbaiLockdown11.jpg)
देशात करोनानं थैमान घातलं आहे. तर महाराष्ट्रातही करोनाचा विळखा घट्ट होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यातील करोनाग्रस्तांची आकडेवारी दिवसेंदिवस वेगात वाढत असून करोनानं कम्युनिटी ट्रान्समिशनद्वार पसरण्यास सुरूवात केली आहे. देशातील अनेक भागात करोना तिसऱ्या टप्प्यावर पोहोचला असून, यात मुंबईचाही समावेश आहे,” अशी माहिती दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिली आहे. कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोना पसरत असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे मुंबईकरांच्या आणि राज्य सरकारच्या चिंतेत आणखी एका संकटाची भर पडली आहे.
देशात गेल्या आठवडाभरात करोनाचा संसर्ग वेगानं फैलावला आहे. देशातील करोनाग्रस्तांची आकडेवारी चार हजारांच्या पुढे गेली असून, मृतांची संख्याही १०९ झाली आहे. देशात महाराष्ट्रात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण असून, दिवसागणिक त्यामध्ये वाढ होत चालली आहे. राज्यात करोनाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना कम्युनिटी ट्रान्समिशनद्वारे करोनानं चंचुप्रवेश केला आहे.