#CoronaVirus: मुंबईतील केईएम रुग्णालयात आणखी एक करोना बाधित
मुंबईतील केईएम रुगणालयात आणखी एका व्यक्तीला करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. काल (रविवार) रात्री या व्यक्तीस कस्तुरबा रुग्णालयात नेण्यात आले. करोनामुळे केईएममध्ये मृत्यू झालेल्या महिलेच्या संपर्कात आलेल्या 16 जणांना विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. यात डॉक्टरांसह परिचारिका आणि निमवैद्यकीय कर्मचारी आहेत.
केईएम रुग्णालयातील आपत्कालीन विभागामध्ये शनिवारी दुपारी ४० वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. महिलेला दाखल केल्यावर कृत्रिम श्वसनयंत्रणा लावण्यात आली. त्या वेळी औषधशास्त्र (मेडिसिन) विभागातील दोन युनिट कार्यरत होते. तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह मेडिसिन विभागातील सर्व निवासी डॉक्टर संपर्कात आल्याने त्यांना वसतिगृहातच अलग राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते. तसेच विभागात त्या वेळी कार्यरत असलेल्या परिचारिकांसह इतर निमवैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही अलग राहण्यास सांगितले आहे.
याच प्रमाणे सैफी रुग्णालयातील करोनाचा संसर्ग झालेल्या हृदविकारतज्ज्ञांच्या १४ जण थेट संपर्कात आलेले असून यातील पाच जणांना विलगीकरण कक्षात दाखल केले आहे. तर त्यांनी शस्त्रक्रिया केलेल्या पाच रुग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.