‘मुद्रांक शुल्कात सवलत देण्याचा विचार’
!['Consideration of concession in stamp duty'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/mv-cm-eknath-shinde-780x470.jpg)
मुंबई : बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात तसेच अधिमूल्यात कपात करण्याचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी विकासकांना दिले. ‘क्रेडाई-एमसीएचआय’च्या वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमएमआरडीए मैदानावर भरविण्यात आलेल्या मालमत्ताविषयक प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. करोना साथीच्या दोन वर्षांच्या काळानंतर ‘क्रेडाई-एमसीएचआय’तर्फे मालमत्ताविषयक प्रदर्शन भरविण्यात आले आहे. १६ ऑक्टोबपर्यंत भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनात १०० हून अधिक विकासक आपल्या मालमत्तांसह सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आणि अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्यमंत्री कार्यालय भूषण गगराणी उपस्थित होते.
करोना काळात मुद्रांक शुल्क दरात कपात केल्याचा मोठा फायदा बांधकाम क्षेत्राला आणि सरकारला झाला होता. सरकारला मोठय़ा प्रमाणावर महसूल मिळाला होता, तर घरविक्रीत प्रचंड वाढ झाली होती. त्याचवेळी अधिमूल्य कमी केल्याने रखडलेले २०० प्रकल्प मार्गी लागले होते. या पार्श्वभूमीवर या सवलती पुन्हा देण्याची मागणी असून गुरुवारी ती मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आली. यावर मुख्यमंत्र्यांनी सरकारकडून विचार करण्यात येईल असे आश्वासन दिले.
मागणी काय?
बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्क दरात ३ टक्क्यांनी कपात करण्याची मागणी मागील काही महिन्यांपासून विकासकांकडून केली जात आहे. त्याच वेळी बांधकामासाठी विकासकांकडून अधिमूल्य आकारले जाते. ते चेन्नई, हैदराबाद, बंगळूरु, दिल्ली या शहरांच्या तुलनेत मुंबईत सर्वाधिक आहे. त्यामुळे यातही कपात करण्याची विकासकांची मागणी आहे.