शीना बोरा जिवंत असल्याचा दावा सीबीआयने फेटाळला
![CBI denies claim Sheena Bora is alive](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/images-75.jpeg)
मुंबई | 2012 मधील शीना बोरा हत्या प्रकरणात आरोपी असणार्या इंद्राणी मुखर्जीने सीबीआयला पत्र लिहून शीना बोरा जिवंत असल्याचा दावा केला होता. कारागृहात आपली माजी पोलीस निरीक्षक आणि कैदी आशा कोरके नावाच्या महिलेसोबत भेट झाली असून त्यांनी काश्मीरमध्ये शीनाची भेट झाल्याचे सांगितले होते, असे इंद्राणीने पत्रात म्हटले होते. तसेच याच आधारे सीबीआयने काश्मीरमध्ये शीना बोराचा शोध घ्यावा, अशी मागणीही इंद्राणीने केली होती. मात्र इंद्राणीचा हा दावा सीबीआयने फेटाळून लावला आहे. सीबीआयने इंद्राणी मुखर्जीच्या याचिकेला विरोध करत उत्तर दाखल केले आणि ती खटल्याच्या सुनावणीस विलंब करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे.
इंद्राणी मुखर्जीच्या वकील सना रईस खान यांनी सादर केलेल्या प्रतिवादात म्हटले आहे की, महाराष्ट्र पोलीस सेवेत 25 वर्षे सेवा दिलेल्या आशा कोरकेच्या जबाबापेक्षा ड्रायव्हर श्याम रायच्या खोट्या कथेवर सीबीआयने विश्वास ठेवत अवलंबून राहणे अत्यंत निंदनीय आहे. सीबीआयने पोलीस दलातील एका समर्पित अधिकार्यापेक्षा एका खोटारड्या चालकावर अवलंबून राहणे हे दुर्दैवी आहे. रेकॉर्डवरील वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे तिची केवळ निर्दोष मुक्तताच करत नाहीत तर तपास पथकाने केलेला चुकीचा तपास आणि हेराफेरी देखील उघड करतात. तसेच इंद्राणीला खोट्या प्रकरणात गोवण्यात आले होते. सीबीआय आशा कोरकेची मुलाखत घेण्यास घाबरत आहे, कारण सीबीआयने केलेल्या दर्जाहीन आणि चुकीच्या तपासाचा पर्दाफाश होईल, अशी भीती त्यांना असल्याचा आरोप इंद्राणीने केला आहे.