ताज्या घडामोडीमुंबई

सावधान! करोनाचे रुग्ण पुन्ह वाढू लागले, आरोग्यमंत्री बोलले…

मुंबई | प्रतिनिधी

 ‘पाश्चिमात्य देशांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असला, तरी महाराष्ट्रात साथरोगाची स्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे तूर्तास मास्क अनिवार्य करण्यात आलेला नाही. मात्र, शारीरिक व्याधीग्रस्त आणि ज्येष्ठ नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे गरजेचे आहे,’ असा आग्रह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी धरला. मुंबई महापालिकेनेही रुग्णवाढ होऊ लागल्याने मास्क वापरावा, असे आवाहन केले.

युरोपातील देश, जपान, चीनमध्ये करोनारुग्ण वाढत असतानाच भारतात राजधानी दिल्ली क्षेत्रासह दिल्ली शहरातही करोनारुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे पुन्हा धास्ती वाढू लागली आहे. या प्रश्नावर आरोग्यमंत्री टोपे यांनी बुधवारी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला. ‘महाराष्ट्रात मोठ्या रुग्णवाढीची परिस्थिती नाही. एकेकाळी राज्यात हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत होते. सध्या १५० ते २०० रुग्ण सापडत आहेत. त्यापैकी ८५ रुग्ण केवळ मुंबईत आहेत. आयसीएमआर, केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचे यावर लक्ष आहे,’ असे टोपे यांनी सांगितले. ‘लसीकरणामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. तर दुसरीकडे बूस्टर मात्रा देण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांना आपली रोग प्रतिकारशक्ती कमी वाटत आहे, अशांनी खासगी रुग्णालयात बूस्टर मात्रा द्यावी,’ असेही टोपे म्हणाले.

केंद्र सरकारने एकूण आठ राज्यांना पत्र दिले आहे. मास्क अनिवार्य करण्याची सूचना त्यात आहे. महाराष्ट्रात लोकसंख्येच्या स्थितीनुसार मास्कबाबत निर्णय घेतला जाईल. मात्र ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे गरजेचे आहे.

– राजेश टोपे, आरोग्यमंत्री

महाराष्ट्रात बुधवारी १६२ नवे रुग्ण

महाराष्ट्रात बुधवारी दिवसभरात १६२ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी मुंबईतील नव्या रुग्णांची संख्या ९८ होती. राज्यात दिवशभरात करोनामृत्यू झाला नाही. सध्या राज्यात ६९० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात नऊ नवे रुग्ण आढळले. यापैकी ठाणे शहरात चार, कल्याण-डोंबिवलीमध्ये दोन, भिवंडीमध्ये तीन रुग्ण आढळले. जिल्ह्यात ४७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

दिल्लीत मोठी रुग्णवाढ; मास्क अनिवार्य

नवी दिल्ली : गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात करोना संसर्गाची भीषण लाट अनुभवणाऱ्या राजधानी दिल्लीत यंदा पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. गेल्या २४ तासांत दिल्लीत करोनाबाधा झालेले १००९ नवे रुग्ण आढळले असून, आठवडाभरात रुग्णसंख्येत १७० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळेच दिल्लीत आता मास्क अनिवार्य करण्यात आला असून, मास्क न घालणाऱ्यास ५०० रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. देशात गेल्या २४ तासांत करोनाचे २०६७ नवे रुग्ण आढळले असून, ४० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५४७ रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत करोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, संसर्ग दर ५.७ टक्क्यांवर पोहोचला आहे. दिल्लीत सध्या २६४१ करोनाबाधित असून, बुधवारी ३१४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वाढत्या संसर्गाची दखल घेत दिल्ली सरकारने मास्क अनिवार्य केला आहे. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button