TOP Newsताज्या घडामोडीमुंबई

मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण सुरु असतानाच BKC मैदानातील लोक उठून निघून गेले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा बुधवारी वांद्रे-कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानावर पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणामध्ये प्रामुख्याने ठाकरे कुटुंबाबरोबरच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्री शिंदे यांचं भाषण जवळजवळ दीड तास सुरु होते. रात्री साडेआठच्या आसपास मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणाला सुरुवात केली आणि ते दहा वाजेपर्यंत बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या या लांबलेल्या भाषणादरम्यान बीकेसीच्या मैदानामध्ये सभेसाठी जमलेला जमाव हळूहळू सभास्थळावरुन काढता पाय घेत असल्याचं चित्र दिसून आलं.

मुख्यमंत्री शिंदे हे सभास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांचे व्यासपीठावर आगमन होताच, उपस्थित जनसमुदायाने टाळय़ांचा कडकडाट करत ‘शिंदे साहेब आगे बढो, शिवसेना जिंदाबाद’ च्या जयघोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी शिंदे यांना १२ फूट लांबीची चांदीची तलवार भेट देण्यात आली. उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव, स्मिता ठाकरे,आनंद दिघे यांच्या भगिनी अरुणा गडकरी यांच्यासह शिंदे गटाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

या स्वागतानंतर आपल्या दीड तासाच्या भाषणात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्या हिंदूत्त्वाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले. राज्यभरातून आलेल्या लाखो शिवसैनिकांसमोर प्रारंभीच नतमस्तक होत शिंदे यांनी अभिवादन केले. ही गर्दी आपल्या भूमिकेला राज्यभरातून मिळत असलेल्या पाठिंब्याचे द्योतक असून खरी शिवसेना कुठे आहे आणि कुणाबरोबर आहे, याचे उत्तरच आज जनतेने दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.

मात्र मुख्यमंत्री शिंदेंचं भाषण फारच लांबलं. अनेक मुद्द्यांना हात घालताना मुख्यमंत्री शिंदे हे आपल्या भाषणातील मुद्दे बऱ्याच वेळा समोर ठेवलेल्या कागदांवरुन वाचून दाखवताना दिसले. तसेच अनेकदा ते घड्याळाकडेही पाहताना दिसले. दहा वाजल्यानंतर ध्वनीक्षेपकाचा वापर करता येत नाही या नियमामुळेच मुख्यमंत्री अनेकदा वेळ तपासून पाहत होते अशी चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र असं असतानाच सोशल मीडियावर शिंदेंचं भाषण सुरु होतं त्यावेळी अनेक समर्थक खुर्चांवरुन उठून निघून जाताना दिसत होते. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच लोक निघून जात असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

दरम्यान, दुसरीकडे शिवाजी पार्कवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अवघ्या पाऊण तासामध्ये म्हणजेच शिंदे यांनी दिलेल्या भाषणाच्या अर्ध्या वेळात भाषण केल्याचं पहायला मिळालं

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button