कृषी कायदे, आरक्षणासह अन्य मुद्यांवरून सत्ताधारी-विरोधक आक्रमक
![Anti-incumbency aggression on other issues, including agricultural laws, reservations](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/FADANVIS-UDDHAV.jpg)
मुंबई |
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांबद्दल नापसंती, इतर मागासवर्गीय समाजाची (ओबीसी) सांख्यिकी माहिती मिळावी आणि मराठा आरक्षणासाठी घटनात्मक प्रक्रिया पार पाडावी, यासाठी आज, सोमवारपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी महाविकास आघाडी ठराव मांडून केंद्रातील भाजप सरकारविरोधात भूमिका घेणार आहे. दुसरीकडे, काँग्रेसने आग्रही मागणी करूनही या अधिवेशनातही विधानसभा अध्यक्षांची निवड होणार नसल्याचे स्पष्ट झाले.
मंत्र्यांचे कथित भ्रष्टाचार, मराठा आणि ओबीसींचे आरक्षण, लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थीची होणारी कोंडी आदी विषयांवर जाब विचारणार असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. विरोधकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाईल या भीतीनेच सत्ताधाऱ्यांनी केवळ दोन दिवसांचे अधिवेशन घेतल्याची टीकाही फडणवीस यांनी केली. विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात ठराव करण्याचा निर्णय घेतला आहे.