आणखी पाच मेगाब्लॉक; ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गासाठी किरकोळ कामे
![Another five megablocks; Minor works for Thane to Diva 5th, 6th route](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/02/mega-block-1.jpg)
मुंबई | नुकताच ७२ तासांचा मेगाब्लॉक घेऊन ठाणे ते दिवा पाचवी, सहावी मार्गिका प्रवाशांच्या सेवेत आली. मात्र या मार्गावरील काही किरकोळ कामांसाठी आणखी पाच मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. हे ब्लॉक आठ ते बारा तासांचे असतील, अशी माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली. हे ब्लॉकही शनिवार किंवा रविवारी घेण्यात येतील. मात्र जलद लोकलसाठी आणि मेल, एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध असल्याने ब्लॉककाळात लोकल फेऱ्या, एक्स्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर कमी परिणाम होईल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
ठाणे ते दिवा दरम्यान मेल, एक्स्प्रेससाठी पाचवी, सहावी मार्गिका उपलब्ध नसल्याने जलद लोकलच्या दोन मार्गिकांवरुनच या गाडय़ा धावत होत्या. त्यामुळे एक्स्प्रेस गाडय़ांबरोबरच लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होत होता. या पट्टय़ात गेल्या बारा वर्षांपासून उभारण्यात येणाऱ्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेला अंतिम स्वरुप देण्यासाठी डिसेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत १२ तास, १८ तास, २४ तास, ३६ तास, १४ तास आणि ७२ तासांचे मोठे मेगाब्लॉक घेण्यात आले. शेवटचा ब्लॉक झाल्यानंतर मार्गिका सेवेत आली. यानंतरही याच मार्गिकेच्या काही कामांसाठी आठ ते बारा तासांचे पाच मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हे ब्लॉक होतील. ठाणे ते दिवा दरम्यान काही ठिकाणी नवीन क्रॉस ओव्हरची (दोन रुळ छेदतात) कामे होणार आहेत. तर दिवा स्थानकातील फाटकाजवळच रेल्वेची जुनी इमारत असून ती पाडण्याचे कामही केले जाईल. यासह अन्य काही तांत्रिक कामांसाठी हे ब्लॉक असतील. हे ब्लॉक शनिवार किंवा रविवारीच होतील. सध्या जलद लोकलसाठी आणि एक्स्प्रेससाठी स्वतंत्र मार्गिका उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ही कामे करताना वेळापत्रकावर फारसा परिणाम होणार नाही, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
प्रवाशांचे हाल कायम
ठाणे ते दिवादरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या मार्गिकेमुळे खबरदारी म्हणून सध्या या पट्टय़ात जलद मार्गिकेवर लोकल व मेल, एक्स्प्रेससाठीही वेगमर्यादा निश्चित केली आहे. त्यामुळे जलद लोकल उशिराने धावत आहेत. फेब्रुवारीअखेपर्यंत हीच स्थिती असेल. त्यामुळे सकाळी व सायंकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांचे हाल कायम राहतील.