अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
![Anil Deshmukh's judicial remand extended by 14 days](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/anil-deshmukh-new.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
१०० कोटींचे कथित खंडणी वसुली प्रकरण आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत आज १४ दिवसांची वाढ करण्यात आली. त्यामुळे देशमुख यांचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.
अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी १०० कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप केला होता. तसेच त्यां च्या विरुद्ध मनी लॉन्डरिंग प्रकरणी इडीने गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणात २ नोव्हेंबरला तब्बल ११ तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. तेव्हापासून ते मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात आहेत. या कालावधीत त्यांनी अनेक वेळा जामिनासाठी अर्ज केले. पण चौकशी पूर्ण झाली नसल्याचे कारण पुढे करून ईडीने त्यांच्या जामिनाला विरोध केला होता. आजच्या अटकेदरम्यान या प्रकरणातील सचिन वाझेसह काही आरोपींना त्यांच्या समोर समोर बसवून चौकशी करण्यात आली. मात्र अजूनही चौकशी पूर्ण झाली नसल्याचा ईडीचा दावा आहे. त्यामुळेच त्यांचा जमीन अर्ज मंजूर केला जात नाही.
आजच्या सुनावणीत त्यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला आणि देशमुख यांची बाजू मांडली मात्र सरकारी वकिलांनी त्याला विरोध केल्याने अनिल देशमुख यांचा आजही जमीन अर्ज फेटाळण्यात आला आणि त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.