अनिल देशमुखांचा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज, उद्या होणार सुनावणी
![Anil Deshmukh's application for bail will be heard in Sessions Court tomorrow](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Anil-Deshmukh.jpg)
मुंबई | प्रतिनिधी
100 कोटींच्या कथित वसुली प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अनिल देशमुख यांनी वकीलाच्या मार्फत आज मुंबई सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या बुधवारी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
100 कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. तब्बल 12 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आल्यानंतर गेल्या 65 दिवसांपासून अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीने मुंबई सत्र न्यायालयातील पीएमएलए कोर्टात सात हजार पानांचे पुरवणी आरोपपत्र देखील दाखल केले आहे. यामध्ये ईडीने अनिल देशमुख यांना या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हटले आहे. तसेच अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि अनिल देशमुख यांच्या पत्नीचा भाऊ यांना देखील सहआरोपी म्हणून आरोपपत्रात नमूद केले आहे.