ताज्या घडामोडीमुंबई

एसटीत २१५ महिला चालक-वाहकांसाठी वर्षभर प्रतीक्षा

मुंबई | एसटी महामंडळात बसगाडय़ांवर वाहक म्हणून महिला असतानाच प्रथमच २१५ चालक आणि वाहक महिला कर्मचारीही रुजू होणार होते. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र करोना निर्बंध, बेमुदत संपामुळे ही प्रक्रिया पूर्णपणे थांबली होती. या महिलांना एसटीच्या सेवेत येण्यासाठी आणखी वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार असून त्यांचे बंद झालेले प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले आहे.

एसटी महामंडळाने चालक-वाहक म्हणून आदिवासी व दुष्काळग्रस्त भागातील महिलांची निवड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार महिला चालकांची भरती करण्याची प्रक्रिया साधारण मार्च २०१९ मध्ये सुरू झाली. आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर यातील १९४ महिलांची निवड करण्यात आली.

त्याव्यतिरिक्त आदिवासी भागातील २१ महिलाही होत्या. त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले होते. त्यानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण व अंतिम चाचणी घेतल्यानंतर या महिला चालकांना सेवेत येण्यासाठी जानेवारी किंवा फेब्रुवारी २०२१ उजाडणार होते; परंतु २०२० मध्ये करोनामुळे टाळेबंदी लागली व प्रशिक्षणच थांबले. त्यामुळे सेवेत येण्याचा कालावधी लांबला.

या महिलांच्या प्रशिक्षणाचा शुभारंभ माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते २३ ऑगस्ट २०१९ ला पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला होता. या महिलांकडे हलक्या वाहनांचा परवाना आहे. एसटी चालवण्यासाठी अवजड वाहन परवाना आवश्यक असतो. त्यांचा अवजड वाहनाचा तात्पुरता परवाना काढून त्याआधारे त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यानंतर महिला चालकांना नियमित परवाना देण्यात येणार होता.

चालक-वाहक महिलांचे प्रशिक्षण करोनाकाळातील निर्बंधांमुळे थांबले होते. निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काहींचे प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले आहे. साधारण वर्षभरात महिला सेवेत रुजू होण्याची शक्यता आहे. – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button