पुण्यातील गर्दीला अजित पवार जबाबदार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर
![Ajit Pawar is responsible for the crowd in Pune, file a case against him too- Pravin Darekar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Pravin-Darekar-Ajit-Pawar.jpg)
मुंबई – पुण्यातील शहर कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावरून सोशल मीडियावरुन राष्ट्रवादीसह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका करण्यात येत आहे. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी देखील राष्ट्रवादी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
पुणे येथे 19 जूनला झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दीला स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.पुण्यातील कार्यक्रमाच्या गर्दीत केवळ 150 नाही, तर सुमारे 5 हजार कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे फक्त दिडशे कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला? असा सवालही प्रविण दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच ममता बॅनर्जींच्या हिंसाचाराच्या विरोधात बीडमध्ये आंदोलन केले. तेव्हा 10 जणांमध्ये सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करुन आंदोलन केले तरी देखील माझ्यावर गुन्हा दाखल केला, याचीही दरेकर यांनी आठवण करुन दिली.
दरम्यान,भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी देखील अजित पवारांवर टीका केली आहे. आमदार गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण.. अशी अजित पवारांची अवस्था आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे. तसेच संयोजकावर का गुन्हा दाखल करतायं, अजित पवारांची जबाबदारी होती, कारण ते तिथं होते, हा कार्यक्रम लोकहिताचा नसून तुमच्या पक्षाचा होता. अजित पवारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले आहेत, तेवढे मागे घ्या, असंही पडळकर यांनी म्हटलंय.