मुंबईपाठोपाठ पुण्यातही होळी, रंगपंचमी खेळण्यास मनाई
![After Mumbai, it is forbidden to play Holi and Rangpanchami in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/03/Holiii.jpg)
मुंबई – मुंबईप्रमाणे पुण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढू लागला आहे. दिवसागणिक हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत असल्याने मुंबईपाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातही होळी आणि रंगपंचमी खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तशी माहिती दिली आहे. होळी आणि रंगपंचमीला लोकांनी एकत्र आल्यास कोरोनाचा प्रसार आणखी वाढण्याचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाचा :-राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,64,881 वर
पुणे हे मागील वर्षी देशातील सर्वात मोठं कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं होतं. कठोर निर्बंधांनंतर तेथील कोरोनाची स्थिती निवळली. इतकी की कोविड सेंटरही बंद करण्यात आलेले. मात्र आता पुन्हा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मुंबईप्रमाणे पुण्यातही दररोज ३ हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होऊ लागली आहे.
दरम्यान, होळी, ईद, शब-ए-बारात, ईस्टरसारखे सण आता काही दिवसांवर आले आहेत. मात्र देशातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना पत्राद्वारे ‘निक स्तरावर जिथे-जिथे गरज आहे तिथे सणांनिमित्त निर्बंध घाला’, असे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्या-जिल्ह्यांत होळीनिमित्त कडक निर्बंध करण्यात येत आहेत.