breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

पोलीस दलातल्या अधिकाऱ्याने, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून उघडपणे जाहीर केली नाराजी

मुंबई – मुकेश अंबानींंच्या “अँटिलिया” बंगल्याबाहेर आढळलेल्या, स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणाचा तपास, मनसुख हिरेन प्रकरण आणि सचिन वाझे, या गोष्टींमुळे मुंबईचं वातावरण सर्वांगानी ढवळलं गेलं आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने हा तपास तातडीने हाती घेतल्यामुळे, तपासाला गती मिळाली असून, या प्रकरणात ‘एनआयए’ दररोज नवे खुलासे करत आहे, तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकीय वातावरणदेखील तापलेलं आहे.

या साऱ्या घटनांवरून महाविकास आघाडीतील ज्येष्ठ आणि वरिष्ठ नेते नाराज असून, लवकरच मंत्रीमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मुंबईच्या पोलीस आयुक्तांच्या झालेल्या बदलीने आणि एकंदरीतच पोलीस दलामध्ये सुरु असलेल्या बदलींमुळे, पोलीस दलातीलही अनेक अधिकारी नाराज असल्याची चर्चा आहे.

त्याचवेळी, पोलीस महासंचालक (DGP) रॅंकचे संजय पांडे यांनी, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आपली नाराजी व्यक्त केली आहे. “माझ्या विरोधात अन्याय झाला आहे. माझं करिअर रोखण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. हे सर्व लिहिताना मला खूप वेदना होत आहेत. माझ्यावर झालेला अन्याय दूर करा.” अशा शब्दांत त्यांनी, त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. तसेच त्यांनी याबाबतचा अधिक खुलासा बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.

त्यामुळे, सचिन वाझे प्रकरणावरून बॅकफूटवर गेलेल्या उद्धव ठाकरे सरकारवर, टीका करण्याची आणखी एक संधी विरोधी पक्षाला या प्रकरणामुळे मिळाली आहे. संजय पांडे यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिल्याची माहिती समोर येताच, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, ट्वीट करून याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “संजय पांडे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून पोलीस दलातील खदखद दिसून येते. सेवा ज्येष्ठता डावलून नियमबाह्य केलेल्या बदल्यांची चौकशी होणे आवश्यक आहे,” असं दरेकर यांनी म्हटले आहेत.

होमगार्डचे डीजीपी असलेल्या संजय पांडेंची बदली, सरकारने ‘महाराष्ट्र स्टेट सिक्युरीटी कॉरपोरेशन’ला केली असून, पोलीस दलात ही साइड पोस्ट मानली जाते. संजय पांडे 1986 IPS अधिकारी आहेत. मुंबईचे नवनियुक्त पोलीस आयुक्त हेमंत नगराळे 1987 बॅचचे तर पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारणारे डीजीपी रजनिश सेठ 1988 बॅचचे IPS अधिकारी आहेत.

दरम्यान, संजय पांडे यांनी लिहीलेल्या पत्राबाबत मुख्यमंत्री कार्यालय, गृहविभाग किंवा गृहमंत्र्यांकडून अजूनही प्रतिक्रिया मिळालेली नाहीये.त्यामुळे आधीच अडचणीत सापडलेल्या सरकारच्या अडचणीत थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button