मुंबईतील ताडदेव भागातील २० मजली इमारतीत भीषण आग ; दोघांचा मृत्यू
![A huge fire broke out in a 20-storey building in Taddev area of Mumbai; Death of both](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/01/Tadeo-fire.jpg)
मुंबई | मुंबईमधील ताडदेव भागातील एका २० मजली इमारतीच्या १८ व्या मजल्यावर सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १३ गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. इमारतीच्या अठराव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या परिसरातील नाना चौकातील गांधी रूग्णालयाच्या समोरील कमला बिल्डिंगला ही आग लागली आहे.या दुर्घटनेत आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार एकूण १५ जण जखमी झाले असून, यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहेत, तर अन्य जणांवर जनरल वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत.
आगवर नियंत्रण मिळवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असून, आग लागलेल्या ठिकाणी आणखी काही लोक अडकलेले असण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली यामागचे कारण अद्याप अस्पष्टच आहे. तर, या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना भाटिया रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे देखील सांगितले जात आहे.