मुंबईत १५ टक्के पाणीकपात ; भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत बिघाड
![15% water loss in Mumbai; Power outage at Bhatsa Dam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2021-10-04-at-12.12.59-PM.jpeg)
मुंबई | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणाच्या विद्युत यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईच्या पाणीपुरवठय़ात १५ टक्के कपात करण्यात आली आहे. विद्युत यंत्रणा दुरुस्त होईपर्यंत ही कपात सुरू राहणार आहे. भातसा हे धरण राज्य सरकारच्या मालकीचे असून विद्युत यंत्रणेतील बिघाडामुळे मुंबईला मिळणारा पाणी पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे ही कपात संपूर्ण मुंबईत लागू केली असल्याचे जल अभियंता विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
ठाणे : भातसा धरणाच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम ठाणे शहरातील पाणीपुरवठय़ावर होणार असून बुधवारपासून पुढील दोन दिवस ठाणे शहरास कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भातसा धरणातील पाणी सोडण्याच्या दरवाजांमध्ये तांत्रिक बिघाड झाला असून त्यामुळे पिसे बंधाऱ्यामधील पाण्याच्या पातळीतही घट झाली आहे. बंधाऱ्यातील पाण्याची पातळी ५० टक्क्यांनी घटली आहे. या बंधाऱ्यातून ठाणे महापालिका क्षेत्रात पाणीपुरवठा होतो. त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील दोन दिवस कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होणार आहे. अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली. शहरात नागरिकांना दोन दिवस पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.