१३ वी वर्षपूर्ती ! स्वर्गीय रमेश देव यांचा वारसा पुढे नेणारी खास शाळा
स्पेशल मुलांसाठी समर्पित एक प्रवास स्पर्श' शाळेची यशोगाथा
मुंबई : अंधेरी पश्चिम — विरा देसाई रोड येथील एका खास संस्थेने नुकतीच आपली १३ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण केली. स्वर्गीय अभिनेते रमेश देव यांचे सुपुत्र अजिंक्य देव आणि सून आरती देव यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवातून प्रेरणा घेऊन ‘स्पेशल चाईल्ड’साठी ही शाळा सुरू केली होती. या शाळेची सुरुवात एका संवेदनशील कारणामुळे झाली. अजिंक्य आणि आरती यांना दोन अपत्ये — आर्य आणि तनया — असून त्यांची मुलगी तनया ही ‘स्पेशल चाईल्ड’ आहे. तिच्या लहानपणीच ही बाब त्यांच्या लक्षात आली होती. मात्र हे नशिबाचे दुःख न मानता, त्यांनी याला ईश्वराचा आशीर्वाद मानले आणि तनयाचे संगोपन विशेष प्रेम आणि काळजीने करण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा : उद्योगभिमुख शिक्षण देण्याची गरज; संदीप कदम
या अनुभवातूनच त्यांनी ठरवले की, तनयासारख्या इतरही मुलांसाठी काहीतरी करावे — आणि त्यातूनच या शाळेची कल्पना आकारास आली. स्पेशल मुलांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आनंददायक दैनंदिन जीवनासाठी या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. पालकांनीही ही संकल्पना मनापासून स्वीकारली आणि आज शाळेच्या कुटुंबात अनेक स्पेशल मुलांचा समावेश झाला आहे. या १३ वर्षांच्या प्रवासानंतर, शाळेच्या वर्धापनदिनानिमित्त एक खास पूजा आयोजित करण्यात आली होती.
या निमित्ताने अजिंक्य देव म्हणाले, “या प्रवासात देवाने वेळोवेळी आम्हाला साथ दिली आणि योग्य दिशा दाखवली. ही शाळा आमच्यासाठी केवळ सेवा नव्हे, तर आमच्या आयुष्याचा एक अमूल्य भाग आहे.” स्वतःच्या दुःखातून प्रेरणा घेऊन समाजासाठी दिलेली ही भेट आज अनेक पालक आणि त्यांच्या स्पेशल अपत्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे.





