13 जुलै पासून ते 16 जुलै पर्यंत मुंबई, कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/Maharashtra-rains-website-1.jpg)
मुंबईत गेल्या 24 तासात मुसळधार पाऊस पडला आहे…असाच पाऊस येत्या 24 ते 48 तासात कोकण विभागात कोसळण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, हवामान विभागाने आजपासून पुढचे चार दिवस म्हणजे 13 जुलै पासून ते 16 जुलै पर्यंत मुंबई, कोकण आणि राज्यातील विविध ठिकाणी हलका, मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली आहे.
हवामान विभागाचे मुंबई केंद्राचे उपमहासंचालक के. एस. होसळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर यासोबतच पश्चिम महाराष्ट्रात सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अनुक्रमे 14,15,16 जुलै या दिवशीही कोकण विभागासह मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. यासोबतच पुढे, सातार जिल्ह्यातील घाट परिसरात तसेच कोल्हापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.