‘हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक हे सांगणं महत्वाचं’, वंचित आघाडी आंदोलन करणार
!['It is important to tell the dictatorial government that the people are the symbol of democracy'](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/3prakash_ambedkar_31.jpg)
मुंबई – प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टर परेड काढण्यात आली होती. मात्र या परेड दरम्यान हिंसाचार पाहण्यास मिळाला. अनेक पोलीस जखमी झाले तर एका शेतकऱ्याचा देखील मृत्यू झाला. दिल्लीतील या परिस्थितीनंतर विविध पक्षातील नेते आता मोदी सरकारवर निशाणा साधत आहे.वंचित बहुजन आघाडेचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी देखील केंद्रावर निशाणा साधला असून, भाजप-आरएसएसचा आम्ही निषेध करतो, असे त्यांनी म्हटले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मोर्चावर पोलिसांनी केलेला लाठीचार्ज अत्यंत चुकीचा आहे. लाल किल्ला सर्वांचा आहे, तो लोकशाहीचा प्रतिकही आहे, पण हुकूमशाही सरकारला जनताच लोकशाहीचे प्रतीक आहे हे सांगणं ही महत्वाचं आहे. RSS-BJP सरकारचा आम्ही निषेध करतो. आंदोलन परिपक्वतेने हाताळणे शिकलं पाहिजे, अशी टीका त्यांनी केली.
दरम्यान, दिल्लीतील हिंसाचारानंतर शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने राज्यभर किसान बाग आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन करणार असल्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीने केला आहे.
दिल्लीतील शाहीन बाग आंदोलनासारखे राज्यात किसान बाग आंदोलन करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतला आहे. या आंदोलनासाठी अनेक मुस्लिम संघटनांना वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे. राज्यभर हे आंदोलन होणार असून शाहीन बागच्या धर्तीवर किसान बाग असे आंदोलनाचे स्वरूप असेल.
केंद्रात बीजेपी सरकारने ज्याप्रकारे हे आंदोलन संपवण्याचा घाट घातला आहे. तसाच प्रकारे हे आघाडी सरकार शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याऐवजी शेतकऱ्यांचे हे आंदोलन संपवण्याचा डाव रचत आहे. मात्र वंचित बहुजन आघाडी कुठल्याही परिस्थितीत किसान बाग आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील वंचित आघाडीने दिला आहे.