सोन साखळीसाठी 20 वर्षीय तरुणाचा खून, मृतदेह खाडीत फेकला, तिघांना अटक
![Illegal possession of the house; Crime filed against 24 including former corporator](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/crime-logo-807_202008478507.jpg)
ठाणे | सोन साखळी मिळवण्यासाठी वीस वर्षीय युवकाची हत्या करणाऱ्या तिघा आरोपींना कासारवडवली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धनराज भारत तरुडे , कृष्णा विनायक घोडके आणि चंदन पासवान अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. अटकेतल्या आरोपींकडून चार तोळे वजनाची सोन्याची चैन, मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली नायलॉन दोरी असा ऐवज हस्तगत करण्यात आल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली.
घोडबंदर रोड वाघबीळ येथील रहिवाशी हेमंत डाकी या रिक्षा चालकाने त्यांचा मुलगा अक्षय डाकी हा बेपत्ता असल्याची तक्रार कासारवडवली पोलीस ठाण्यात 4 सप्टेंबर रोजी दाखल केली होती. या तक्रारीनंतर कासारवडवली पोलिसांनी दोन पथके बनवून बेपत्ता अक्षयचा सर्वत्र शोध सूरु केला होता. दरम्यान, अक्षय घोडबंदर रोडवरील पानखंडा परिसरात धनराज नामक आपल्या मित्रास भेटण्यास नेहमी जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी धनराज तरुडे याचा शोध घेऊन त्याला विचारपूस केली. परंतु धनराज उडवा उडवीची उत्तरे देत होता. धनराजवर संशय बळावल्याने पोलिसांनी त्याच्याबाबत परिसरात चौकशी केली असता एका रिक्षा चालकाने त्याच्या बाबत पोलिसांना माहिती दिली. 4 सप्टेंबर रोजी धनराज याने रिक्षातून एक भारी वजनाची गोणी अहमदाबाद महामार्गावरील ब्रिज वरुन खाडीत फेकून दिल्याचे या रिक्षा चालकाने पोलिसांना सांगितले