‘सिल्वर ओक’वर वादळापूर्वीची शांतता?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/358865-sharadpawarcar.jpg)
मुंबई | गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्र एका वेगळ्याच राजकीय नाट्यमय घडामोडींना सामोरा जात आहे. त्यातच शनिवारी सकाळी पहिल्यांदाच इतिहासातील ‘राजकीय भूकंप’ महाराष्ट्राने अनुभवला. शनिवार आणि रविवार हा अतिशय राजकीय घडामोडींचा ठरल्यानंतर आज शरद पवारांचे मुंबईचे निवास्थान ‘सिल्वर ओक’ शांत पाहायला मिळणार आहे. ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना असा देखील कयास लावला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पहाटेच कराडला निघाले. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त चव्हाणांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी पवार कराडला जात आहेत. सकाळी आठ वाजता प्रिती संगमावर पवार श्रद्धांजली अर्पण करणार असून त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीला पवार हजेरी लावतील. या कार्यक्रमात पवारांच्या हस्ते एक पुस्तक प्रकाशन देखील होणार आहे. संध्याकाळी साताऱ्यात साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला आणि एका कॉलेजच्या उदघाटनाला ते उपस्थित असतील. त्यानंतर संध्याकाळी शरद पवार पुन्हा मुंबईत परतणार आहेत.