सरकारी दिनदर्शिकेतून फुले, आंबेडकर गायब – धनंजय मुंडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/फुले-व-आंबेडकर.jpg)
मुंबई – महाराष्ट्र शासनातर्फे प्रकाशित व वितरित करण्यात आलेल्या वर्ष २०१९च्या दिनदर्शिकेवर महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतिराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. दिनदर्शिकेमध्ये महामानवांच्या झालेल्या अवमानाबाबत मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्य सरकारने छापलेल्या दिनदर्शिकेत महात्मा फुले पुण्यतिथी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचा उल्लेख न केल्याने सरकार मनुवादी वृत्तीचे असल्याचे सिद्ध झाले असून सरकारच्या या मनोवृत्तीचा मी तीव्र शब्दात निषेध करतो.@CMOMaharashtra @MahaDGIPR
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) January 5, 2019
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक वैभवाचा कसलाही उल्लेख दिनदर्शिकेवर नाही. राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ता. ६ डिसेंबर हा महापरिनिर्वाण दिन, क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांची २८ नोव्हेंबर ही पुण्यतिथी अशा महत्त्वाच्या घटनांच्या नोंदी-उल्लेख त्या दिवसांच्या रकान्यात नाहीत. याबाबत मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. ‘या सरकारकडून वारंवार जाणीवपूर्वक महामानवांचा अवमान होत आहे. यापूर्वीही अशा अनेक चुका झाल्या आहेत. माहिती व जनसंपर्क विभाग वारंवार चुका करत असताना कारवाई मात्र केली जात नाही. सरकारला महामानवांच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्रही पाठवले आहे.