श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवून ठेवतात- राजेश टोपे
![‘Those’ 11 laboratories have been de-recognized, Health Minister Tope said](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Rajesh-Tope-3-1.jpg)
मुंबई – आयसीयू बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांचा जीव जात असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं खापर श्रीमंत लोकांवर फोडलं आहे. गरज नसतानाही अनेक श्रीमंत लोक आयसीयू बेड अडवून ठेवतात. त्यामुळे बेड्सची कमतरता निर्माण होते. मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तसंच, चाचण्या कमी झाल्या नसून ट्रेसिंग वाढवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “अनेकदा रुग्ण स्वत:च आयसीयूत दाखल होण्याचा निर्णय घेतात. दबाव आणून आयसीयू बेड अडवले जात आहेत. छोट्या शहरांमध्येही हे सुरु असून ते चुकीचं आहे. आयसीयू बेड हे आयसीयूच्या रुग्णांनाच मिळाले पाहिजेत. कोणतीही लक्षणं नसणाऱ्यांना ते दिले नाही पाहिजेत. पण दुर्देवाने काही श्रीमंत लोक जे खर्च उचलू शकतात ते आयसीयू बेड अडवतात. त्यामुळे अनेकदा आयसीयू बेड्सची कमतरता जाणवते. याबद्दल जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना जागरुक राहावं लागेल. लक्षणं नसणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेड देण्यावर प्रतिबंध आणावे लागतील,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
राज्यातील चाचण्या कमी झाल्याच्या तक्रारी विरोधी पक्षनेत्यांनी केले आहेत. याबाबत बोलताना टोपे म्हणाले की, १०० टक्के ट्रेसिंगवर भर दिला जात आहे. नियंत्रण आणण्यासाठी ट्रेसिंग करणं रामबाण उपाय आहे. कोरोना रुग्णाच्या संपर्कातील २० जणांना ट्रेसिंग कऱणं आम्ही बंधनकारक केलं आहे. जे कमी करत आहेत त्यांना सतत सूचना देत आहोत. ट्रेसिंग वाढलं की टेस्टिंग वाढतं. त्यात जे पॉझिटिव्ह आढळतात त्यांना क्वारंटाइन केलं जातं, उपचार दिले जातात”. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी बोलताना आम्ही चौकशी करुन माहिती घेऊ. तसंच योग्य पद्धतीनं त्यावरील निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं.