शिवसेनेच्या काळात एसटी महामंडळाची वाट लागली; काँग्रेस नेत्याचा सरकारला घरचा अहेर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/11/uddhav-thackeray-Jaiprakash-Chhajed-696x364-1.jpg)
मुंबई : शिवसेनेच्या काळात खासगी कंत्राटदार आणल्याने एसटी महामंडळाची वाट लागली, असा आरोप इंटकचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेडयांनी करत सरकारला घरचा अहेर दिला आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्य सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक महिन्यांचे वेतन रखडल्यानं एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत.
थकीत वेतन तत्काळ दिले नाहीत तर एसटी कर्मचारी संपाचे अस्त्र उपसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे .एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीआधी दिले नाहीत तर आम्ही महामंडळावर फौजदारी गुन्हा दाखल करू, असा इशारादेखील जयप्रकाश छाजेड यांनी दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जयप्रकाश छाजेड म्हणाले की, कोरोनाच्या काळात एसटी सेवा बंद होती. त्यामुळे एसटी महामंडळाचं आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडलं. गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतनच मिळाले नाही. कोरोना काळात काम करूनही एसटी कर्मचाऱ्यांना पगार नाही.
ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यामुळे संसाराचा गाडा रेटायचा तरी कसा? हा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. त्यात दिवाळी सण तोंडावर आला आहे. सण साजरा करायचा तरी कसा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.