शिवसेनेची मुंबई महापालिकेवर जोरदार टीका
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Untitled-5.png)
मुसळधार पावसामुळं मुंबईच्या झालेल्या अवस्थेवरून विरोधी पक्ष भाजपने शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेवर जोरदार टीका सुरू केली आहे. ‘मुंबई महापालिकेने ठरवून मुंबईत पाणी साचण्याची व्यवस्था केली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,’ अशी उपरोधिक टीका भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रसाद लाड यांनी केली आहे.
गेले दोन दिवस मुंबईत जोरदार पाऊस झाला. सखल भागांत पाणी तुंबलं. बैठ्या चाळीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. इतकंच नव्हे तर जे. जे. रुग्णालयातही पाणी भरलं होतं. मंत्रालय परिसरात तुंबलेल्या पाण्याबद्दल खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केलं होतं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही पावसाचा फटका बसला. मुंबईकरांचे हालहाल झाले. ही संधी साधून विरोधकांनी मुंबई महापालिका व शिवसेनेला घेरलं आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/Capture-23.jpg)
भाजपचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काल नगरमध्ये बोलताना मुंबईतील भ्रष्टाचाराकडे बोट दाखवले होते. शिवसेनेमुळंच मुंबईची ही दुर्दशा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनीही मुंबई महापालिकेवर तोफ डागली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. ‘मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचलंय. याला मुंबईत पडणारा मुसळधार पाऊस आणि करोना जबाबदार आहे,’ असं त्यांनी म्हटलंय. ‘लोकांनी घराबाहेर पडू नये, करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईत पाणी साचले पाहिजे अशी व्यवस्था यंदाही मुंबई महापालिकेनं केली आहे. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा,’ असा टोला त्यांनी हाणला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यांपासून राज्य सरकारकडून नागरिकांना शक्यतो घरातच राहण्याचे सल्ले दिले जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून वेळोवेळी तसं आवाहन केलं आहे. तोच धागा पकडून लाड यांनी मुख्यमंत्र्यांना शाब्दिक चिमटा काढला आहे. ‘सर्वांनी घरीच राहा. गरम पाणी प्या,’ असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय.