breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

“शाह विश्वासघातकी, फडणवीसांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य”

सिंधुदुर्ग – “केंद्रीय गृहमंत्री अमित शाह खोटारडे आणि विश्वासघातकी आहेत. शाहांच्या हटवादीपणामुळे सतरा ते अठरा पक्ष एनडीएतून बाहेर पडले. भाजप आणि आणखी एक पक्ष सोडला, तर सर्वच पक्ष भाजपपासून दुरावले आहेत. त्यामुळे विश्वासघातकी नेमकं कोण, हे आता दिसून येत आहे” अशा शब्दात शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शाहांच्या टीकेला उत्तर दिलं. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे युती तुटल्याचं भाजपच्या दिल्लीश्वरांनाही मान्य असल्याचं विनायक राऊत म्हणाले.

“केवळ भाजपच्या विश्वासघातकीपणामुळे शिवसेनेला दूर जावं लागलं. अमित शाह ज्या बंद खोलीत चर्चा झाली म्हणतात, ती त्यांच्या दृष्टीने खोली असेल, मात्र शिवसेना आणि संपूर्ण देशासाठी एका दैवताचं मंदिर आहे. त्याच मंदिरातील दैवताने अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी एवढा मोठा आशिर्वाद ठेवला होता, म्हणून देशाला आज नरेंद्र मोदी आणि अमित शाह दिसत आहेत” असा टोला विनायक राऊतांनी लगावला.

“राज्यसभेचे खासदार नारायण राणे आणि अमित शाह यांच्यासारख्या समविचारी लोकांची युती झाली असेल. ही युती लाईफटाईम टिको अशी अपेक्षा आहे. भाजपकडून खोटारडेपणाचं राजकारण सुरु आहे. केंद्रात जी सत्ता आली आहे ती निष्ठूरपणे राबवायची हा त्यांचा एकमेव धंदा आहे. जो विरोधात गेला त्याच्या पाठी ईडी लावायची” अशी टीकाही राऊतांनी केली.

“खोटं बोल पण रेटून बोल याच कारणामुळे संपूर्ण एनडीए, जो अटलबिहारी वाजपेयी यांनी स्थापन केला, तो आज यांच्या खोटारडेपणामुळे विखुरला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे लाड पुरवण्यासाठी तुम्ही वारंवार खोटं बोलत होता. मात्र भाजपमधील अनेक लोकांना आजही वाटते की त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी घोडचूक केली. स्वतःच्या फायद्यासाठी युतीचा फायदा करुन घेतला. केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टापायी युती तुटली, हे आता दिल्लीतील भाजपचे नेते मान्य करत आहेत” असा दावा विनायक राऊतांनी केला.

“राणेंच्या हॉस्पिटलला शिवसेनेने कदापिही खो घालण्याचा प्रयत्न केला नाही, उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा फाईल आली, तेव्हा तातडीने मंजुरी देण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. जो प्रस्ताव रखडला होता तो राणेंच्या कंगालपणामुळे” असा घणाघातही विनायक राऊत यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button