‘शरद पवार जाणता राजा होते, आहेत आणि पुढेही राहणारच’, मुंबईत पोस्टर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/4-14.jpg)
मुंबई |महाईन्यूज|
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यात आली यानंतर मोठा वाद निर्माण झाला. देशभरातून यावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर भाजप नेते आणि महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनीही यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला.
शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करण्यात येतो यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि जोरदार निशाणा साधला. आता उदयनराजे यांच्या टीकेला उत्तर देत मुंबईत समर्थकांकडून पोस्टर झळकावण्यात आलं आहे. या पोस्टरवर शरद पवार जाणता राजा असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. घाटकोपरमध्ये हे पोस्टर झळकले आहे.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष नितीन देशमुख यांनी हे पोस्टर लावले आहेत. यावर लिहिले आहे की, ‘आपापली राजकीय विचारसरणी निश्चित जोपासा, पण ज्या नेतृत्त्वामुळे महाराष्ट्र जगात ओळखला जातो त्या नेतृत्त्वावर अल्पमाहिती, अल्पज्ञानातून शिंतोडे उडवू नका. शरद पवार साहेब आम्हा तरुणांचे कालही जाणता राजा होते, आजही जाणता राजा आहेत आणि भविष्यातही जाणता राजा राहणारच’
उदयनराजे म्हणाले होते की, जानता राजा फक्क फक्त शिवाजी राजेच आहेत. आज शिवाजी राजे प्रतेकाच्या देव्हाऱ्यात आहेत. त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. तसेच कोणालाही जानता राजा म्हणणे योग्य नाही. ही उपमा कोणी दिली असा सवालही त्यांनी केला. एक युगपुरुष जन्माला येतो, ते आमचे शिवाजी महाराज आहेत. तसेच जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजच आहेत. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा थोडा विचार करावा. इतर कोणालाही ही उपमा लावली जात आहे, त्याचाही मी निषेध करतो असं उदयनराजे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली होती.