विधान परिषद दंगल : शिवसेनेकडून अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद यांना संधी मिळणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/1570784157_100.jpg)
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषद राज्यपाल नियुक्त सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून, प्रत्येक पक्ष ‘कला’ क्षेत्रातील व्यक्तींना विधान परिषदेत संधी देण्याची हालचाली करीत आहे.
लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. व येत्या मंगळवारी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांचाही निसर्ग आॅफिस पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. त्यामुळे ‘कला’ क्षेत्रातील कोणत्या कलावंतांला विधानपरिषद निवडणुकीत संधी मिळणार? हा विषय चर्चेत आला आहे.
शिवसेनेकडून ही अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत कळवा-मुब्रा मतदार संघात विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शिवसेना पक्षाच्या आदेशानुसार अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी काट्याची टक्कर दिली होती. परंतु पराभवाने न खचता अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद पुन्हा त्याच जोशाने चांगले काम करीत आहेत. शिवसैनिकांत उत्साह भरण्याचे काम करीत आहेत.
‘मातोश्री’ वरुन त्यावेळी संधी देण्याचा शब्द…
विधानपरिषद निवडणुकीत अभिनेत्री दिपाली भोसले-सय्यद यांना उमेदवारी मिळावी यासाठी अभिनेत्री दिपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने व युवा सेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडे मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शिवसेना पक्ष प्रवेशावेळी त्यांना ‘मातोश्री’ वरुन चांगल्या संधीचा शब्द ही देण्यात आला आहे. त्यामुळे विधानपरिषद निवडणुकीत अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्या नावाची चर्चा जोर धरु लागली आहे.
चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून समाजिक बांधिलकी…
अभिनेत्री दिपाली भोसले- सय्यद यांनी दिपाली भोसले- सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सांगली-कोल्हापूर महापूरादरम्यान सामाजिक बांधिलकी म्हणून पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. ट्रस्टच्या माध्यमातून मुंबई व अहमदनगर जिल्ह्यातील जनतेसाठी स्वत: रस्त्यावर उतरुन अन्नदान, माॅस्क वाटप, सॅनिटायझर वाटप केले. व रस्त्यावर सेवा बजावणा-या पोलिस काॅलनीमध्ये सॅनिटायझर फवारणी केली आहे. अपंग कलाकारांच्या प्रश्नावरही आवाज उठवून त्यांना दिपाली भोसले- सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सर्वापतोरी मदतीचा हात दिला आहे. आत्ता पर्यंत कोणत्याही पदावर नसताना ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्र भर 50 लाखांची मदत जनतेसाठी केली आहे.