वाहतूक कोंडीमुळे पश्चिम द्रूतगती महामार्ग बनला महाराष्ट्रातील सर्वात प्रदूषित महामार्ग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Traffic-on-western-.jpg)
मुंबई – गेल्या २ महिन्यात हवामानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे वाढत असलेला उष्मा तसेच संध्याकाळी वातावरणात बदल झाल्यामुळे सुटलेली थंड हवा मुंबईकरांच्या पचनी पडत नसल्याचे दिसत आहे, यातच कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी मुंबईची जीवनवाहीनी समजली जाणारी लोकल सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध नसल्यामुळे मुंबईच्या सर्वच महामार्गावर वाहनांची गर्दी झाली असल्यामुळे वायू प्रदूषणात भर पडत आहे. सध्या पश्चिम द्रूतगती महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वात जास्त गाड्यांच्या वर्दळीचा महामार्ग असून १० किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी ३ ते ४ तासाचा अवधी लागत आहे.
अंधेरी ते दहिसर भागात राहणाऱ्या नागरिकांना या वाढलेल्या वाहतूककोंडीचा तसेच बदलत्या हवामानाचा त्रास जाणवू लागल्यामुळे श्वसनविकार आणि त्वचाविकारांमध्ये सातत्याने भर पडत असल्याची माहिती बोरीवली येथील अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे देण्यात आली आहे. गरोदर महिला, लहान मुले व वयोवृध्दांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे. याविषयी अधिक माहिती देताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे छातिरोग -फुफ्फुसविकारतज्ञ डॉ. जिग्नेश पटेल म्हणाले, “वायू प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली कीं फुफ्फुसाचे आजार बळावत असल्याचेही या प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो. कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण अधिक असेल श्वासातून तो शोषला जातो, त्याची रक्तातील पातळी वाढली तर लोह तयार करण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे ऑक्सिजन पातळी खालावून चक्कर येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, मळमळणे ,डोक्याचा मानेखालील भाग दुखत राहण्याचा त्रास हवेतील धुळीमुळे वाढतो. धुळीचे लोट वाऱ्यासोबत वाहत राहिले वा कोंडीमुळे प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ होते.
पश्चिम द्रूतगती महामार्गावरील वाहतूककोंडीने वायूप्रदूषणाची समस्या चिंतेची ठरली आहे. दिवसाचे जवळपास २४ तास वाहतूक सुरू असल्याने वायूप्रदूषणाची झळ सोसावी लागत आहे त्यासोबतच बोरीवली ते वांद्रेपर्यंत जाणारे एस. व्ही. रोड, लिंक रोडवर प्रचंड वाहतुकीमुळे वायू प्रदूषणाची समस्या जास्त आहे. बोरीवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनीसारख्या मोठ्या हरित पट्ट्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे अशी माहिती डॉ जिग्नेश पटेल यांनी दिली. याआधी अनेकवेळा वैद्यकीय क्षेत्रातून मुंबईतील एकूणच वाहतूककोंडी आणि प्रदूषणाचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे मत मांडले गेले आहे . त्याचबरोबर, मैदानांची कमी झालेली संख्या आणि वाढत्या क्राँकीटीकरणाने हवेच्या प्रदूषणात भर पडली आहे, याकडेही सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे.