लॉकडाऊन काळात अखंड वीजपुरवठा करावा आणि थकबाकीदारांची वीज कापू नये; महावितरणाच्या अध्यक्षांचे निर्देश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Capture-16.jpg)
लॉक़डाऊनच्या काळात अखंड वीजपुरवठा करावा तसेच थकबाकीदारांची वीज कापू नये,असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष असीमकुमार गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सध्या शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षण ऑनलाइन सुरू आहे. अनेक कार्यालयांची कामेही ऑनलाइनच होत आहेत. त्यामुळे या काळात अखंड वीजपुरवठा करावा तसेच थकबाकीदारांची वीज कापू नये, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक असीमकुमार गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
लॉकडाऊन काळात वीज मीटरचे वाचन न झाल्याने ग्राहकांना सरासरी देयके पाठविण्यात आली होती. लॉकडाऊन पश्चात महावितरणने मीटरचे वाचन सुरू केले. त्यावेळी भरणा केलेल्या सरासरी देयकाची वजावट ग्राहकांना देण्यात आली. सरासरी वीज वापराची युनिटनिहाय वजावट देण्यात आलेली नाही. यामुळे जून ते सप्टेंबरदरम्यान ग्राहकांना भरमसाठ वीज देयके आली आहेत. काही ग्राहक ही देयके भरत आहेत, तर काही ग्राहकांची थकबाकी आहे. करोना संकट असल्याने आर्थिक अस्थिरतेमुळे अनेक ग्राहकांना अशा भरमसाठ देयकांचा भरणा करणे शक्य झालेले नाही. यामुळे थकबाकी प्रचंड वाढली असली तरी सध्याच्या संकटकाळात अशा ग्राहकांची वीज कापू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.
असीमकुमार गुप्ता यांनी अलिकडेच महावितरणच्या उच्चाधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यभरात सध्या शाळा, महाविद्यालयांचे वर्ग व परीक्षा ऑनलाइन होत आहेत. प्रामुख्याने आयटी व इतर क्षेत्रातही ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजपुरवठा सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक कामे असल्याखेरीज वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभालीसाठी वीजपुरवठा बंद ठेवू नये. महावितरणकडून अखंडित वीजपुरवठा सुरळीत राहील याची काळजी घेण्यात यावी. तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी व्यवस्थेतून प्राधान्याने वीजपुरवठा करण्यात यावा. अत्यंत आवश्यक काम असेल तरच वीजयंत्रणेच्या पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद ठेवावा, अन्यथा तो बंद ठेऊ नका, अशा सूचना गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत.