राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटीलही भाजपच्या गळाला?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/ranjeetsigh-mohite-patil.jpg)
मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्यातील खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीला गेले आहेत. राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील आज दुपारी एक वाजता भाजप प्रवेश होत असताना विरोधी पक्षातील आणखी नेता भाजपने गळाला लावला की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास मंत्री गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी रणजितसिंहांना भाजपने माढ्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याबाबत चाचपणी केल्याचे कळते. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे सोलापूरमधील मंत्री सुभाष देशमुख यांच्या मधस्तीने भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. आता रणजितसिंहांनी गिरीश महाजनांची घेतलेल्या भेटीमुळे याला पुष्टी मिळताना दिसत आहे.
दरम्यान, सुजय विखे यांनी आज सकाळी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर सुजय हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले. गिरीश महाजन यांनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाची सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे. तसेच त्यांना साई संस्थानाचे उपाध्यक्षपद देण्याबरोबरच नगर लोकसभेची उमेदवारी दिली जाणार आहे. सुजयनंतर रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. तसे झाल्यास माढ्यातून रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढणार हे स्पष्ट आहे.