राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु, आता पुन्हा लॉकडाऊन नाही !
मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली असताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज (२२ जुलै) पत्रकार परिषद घेतली. यावेळी राजेश टोपे यांनी राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या काही गोष्टींवर भाष्य केले आहे.
राज्यातील अनलॉकच्या प्रक्रियेबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले कि, “राज्यात आता ‘मिशन बिगिन अगेन’च्या प्रक्रियेला सुरुवात झाल्याने आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही. उलट जास्तीत जास्त गोष्टी पुन्हा कशा सुरु करता येतील याबाबत सध्या सरकार विचार करत आहे. विशेषतः जिम्स, शॉपिंग मॉल्स सुरु करण्याबाबत निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे.” मात्र, “मुंबईतील लोकल सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील”, असेही राजेश टोपेंनी स्पष्ट केले.
आरोग्यमंत्र्यांनी यावेळी राज्यातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये घडणाऱ्या प्रकाराबद्दल देखील तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “राज्यातील क्वारंटाईन सेंटर्समध्ये घडणाऱ्या घटना अतिशय निंदनीय आहेत. म्हणूनच आता क्वारंटाईन सेंटर्ससाठी सरकारकडून लवकरच काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात येतील. यानुसार, क्वारंटाईन सेंटर्समध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे वॉर्ड्स करण्यात येतील. यासाठी काही नियम बदलण्याची आवश्यकता असल्यास आम्ही ते निश्चित बदलू. त्याचप्रमाणे, अशा निंदनीय घटनांसाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई देखील करू”, असे राजेश टोपेंनी यावेळी सांगितले आहे.





