राज्याच्या विविध भागांतून थंडी झाली गुल…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Temperature-frame.jpg)
मुंबई | महाईन्यूज
राज्यातील कमाल तापमानात गेल्या दोन दिवसांत मोठी वाढ झाली असून, अनेक ठिकाणी पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. तर राज्यात बहुतांश ठिकाणी किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वरच राहिलेले आहे. गेल्या आठवडय़ात वाऱ्यांची दिशा बदलल्यानंतर राज्याच्या किमान आणि कमाल तापमानात वाढ होऊ लागली. किमान तापमानातील वाढ तुलनेने कमी असून, कमाल तापमानात मोठी वाढ दिसून आली. परभणी, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती या ठिकाणी पारा ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला. त्यामुळे सकाळी गारवा आणि दिवसा वाढलेल्या तापमानामुळे उन्हाळ्याचा अनुभव आला आहे.
तुलनेने गेल्या आठवडय़ात ३५ अंश पार केलेले मुंबईचे कमाल तापमान दोन दिवसांत काही प्रमाणात कमी झाले आहे. रविवारी मुंबईचे कमाल तापमान ३२.६ अंश, तर किमान तापमान १९.२ अंश नोंदविण्यात आले आहे. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान नागपूर येथे १२.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे.