रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/images_1583119928690_27_11_2019_rashmi_thakery_19794994_82938894.jpg)
मुंबई : मुंबईतील कोरोनास्थिती गंभरी होत असताना आता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबाची देखील चांगलीच चिंता वाढली आहे. काहीच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरेंच्या २ सुरक्षारक्षकांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ठाकरे यांच्या सुरक्षकालाही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. २ दिवसांपूर्वी रश्मी ठाकरेंच्या सुरक्षारक्षकाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे, आता ‘मातोश्री’च्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
मुख्यमंत्र्यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वरून यापूर्वीही कोरोना संसर्गाच्या बातम्या आल्या आहेत. सर्वात आधी ‘मातोश्री’ परिसरातील एका चहा विक्रेत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर, ‘मातोश्री’वर सुरक्षारक्षक म्हणून तैनात असलेले ३ पोलिसही कोरोना पॉझिटिव्ह आले होते. तसेच काहीच दिवसांपूर्वी तेजस ठाकरेंच्या २ सुरक्षारक्षकांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त होते. त्यानंतर इतर सुरक्षा रक्षकांची चाचणी करून त्यांना क्वॉरंटाईनही करण्यात आले आहे. तेजस ठाकरे यांना व्हाय प्लस सुरक्षा आहे. त्यानंतर, आता रश्मी ठाकरेंच्या सुरक्षारक्षकांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे.