breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

यंदाचा दसरा मेळावा स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, कार्यक्रम रुपरेषा जाहीर

मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यादांच दसरा मेळावा होणार आहे. मात्र, यंदा दसऱ्याला कोरोनाचे सावट असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजी पार्कात दसरा मेळावा न घेता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात मेळावा घेण्यात येणार आहे. अवघ्या ५० मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी 6.30 वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील आणि मग ठीक 7.00 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भाषण सुरू करून जनतेला संबोधित करणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. तसेच शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाला केवळ इलेक्ट्रॉनिक चॅनेल्सच्या पत्रकारांना परवानगी असून त्यांच्यासाठी संयुक्त महाराष्ट्र दालन येथे “पत्रकार कक्ष” उभारण्यात आला आहे. पत्रकार कक्षातून प्रसार माध्यमे ‘थेट प्रक्षेपण’ करू शकणार आहेत. मात्र, छायाचित्रकारांना स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात प्रवेश बंदी असल्याचंही शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

राज्य सरकारनं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अंशी अनलॉक केलं असलं तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. त्यामुळं सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधनं कायम आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती. त्यानुसार मेळाव्याचं स्वरुप काय असावं? तो कसा घेतला जावा? यावर चर्चा सुरु आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आला आहे. त्यापार्श्वभूमीवर शिवाजी पार्कमधील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकातील सभागृहात दसरा मेळावा घेण्याचा प्रस्ताव पुढे आला. स्मारकाच्या सभागृहात मेळाव्याचं व्यासपीठ उभं करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं भाषण लाईव्ह प्रसारित केलं जाईल, अशी सूचना मांडण्यात आली. तर पक्षाचे नेते आणि लोकप्रतिनिधींपैकी अगदी मोजक्या व्यक्तींनाच सभागृहात प्रवेश दिला जाईल अशीही शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button