मुस्लिम आरक्षणासाठी आंदोलनाचा इशारा
मुंबई – काँग्रेस आघाडी सरकारने मुस्लिमांना दिलेले आरक्षण घटनात्मक होते. त्यामुळे ते लागू केले जावे यासाठी राज्यभरात आंदोलन केले जाणार आहे. मुस्लिम समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये 5 टक्के आरक्षण मिळण्यासाठी राज्यातील मुस्लिम समाजाला एकत्रित करण्यात येईल व राज्यभरात अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय रविवारी मुंबईत झालेल्या मुस्लिम आरक्षण संयुक्त कृती समितीच्या बैठकीत घेण्यात आला. हे आरक्षण मिळवण्यासाठी राज्यव्यापी लढा उभारण्याची घोषणा खासदार हुसेन दलवाई यांनी केली.
मुस्लिमांनी अद्ययावत तंत्रज्ञानाची कास धरावी. शाळांमध्ये दर्जदार शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करावे, आरक्षणासाठी कायदेशीर लढाईस लागणारी सर्व प्रकारची मदत करण्यात येईल, अशी ग्वाही इनामदार यांनी दिली. या वेळी जनता दलाचे मुंबई अध्यक्ष प्रभाकर नारकर, माजी मंत्री अनीस अहमद यांच्यासहित पदाधिकारी उपस्थित होते.