मुलाच्या लग्न पत्रिका वाटण्यासाठी पुण्याहून आलेल्या वडीलाचा लोकलमधून पडून मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/Train-fall3.jpg)
मुंबई – मुलाच्या लग्नाच्या निमंत्रणपत्रिका वाटण्यासाठी पुण्याहून मुंबईला आलेल्या तानाजी लवांगरे (५९) यांचा बुधवारी रात्री लोकलमधून पडून मृत्यू झाला. कुर्ला स्टेशनजवळ ही दुर्देवी घटना घडली. ते सीएसएमटीच्या दिशेने येणाऱ्या लोकलमध्ये होते. पाय घसरुन ते रुळावर पडले असावेत असे कुटुंबियांनी सांगितले.
रात्री १०.५५ च्या सुमारास कुर्ला स्टेशन मास्तरांनी रेल्वे पोलिसांना प्लॅटफॉर्म नंबर सहावर अपघात झाल्याची माहिती दिली. जीआरपी पोलीस तिथे पोहोचले तेव्हा तानाजी लवांगरे रुळावर जखमी अवस्थेत पडलेले होते. रेल्वे पोलिसांनी त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात हलवले. तिथे त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. ट्रेनमधून उतरताना ते पडले असावेत असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.
त्यांच्या बॅगेमध्ये लग्नाच्या निमंत्रण पत्रिकांचा गठ्ठा होता. त्यावर त्यांचे नाव आणि पुण्याचा पत्ता लिहिलेला होता. तानाजी लवांगरे यांचा फोन तपासल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मुलगा सुमितला फोन केला. सुमितने १९ जूनला आपले लग्न होणार असून वडिल नातेवाईक आणि मित्र परिवाराला निमंत्रण पत्रिका वाटण्यासाठी मुंबईला गेले आहेत असे सांगितले. लवांगरे यांची मुलगी ऐरोली येथे रहाते. तिच्या घरी त्यांनी निमंत्रण पत्रिका दिली व मुंबईतील अन्य नातेवाईकांना निमंत्रण पत्रिका देण्यासाठी ते फिरत असताना ही दुर्देवी घटना घडली.