मुख्यमंत्र्यांना धमकावणारा आरोपी इसम गजाआड, मुंबई ATSची कारवाई
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/udhav_2017084839.jpg)
मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेले ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी देणारा व्यक्ती अखेर गजाआड झाला आहे. मुंबई पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) कोलकात्याहून एका इसमाला अटक केली आहे. हा आरोपी इसम ४९ वर्षीय असून कोलकात्यातील टोलीगंज भागात राहणारा जिम प्रशिक्षक असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांसह अन्य महत्त्वाच्या नेत्यांना आलेल्या धमकीमुळे राजकीय वर्तुळातून चिंता व्यक्त केली जात होती.
काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, शिवसेना खासदार संजय राऊत अशा राज्यातील आणि महाविकासआघाडी सरकारमधील महत्वाच्या नेत्यांना धमकीचे फोन केल्याचा आरोप या इसमावर ठेवण्यात आला आहे. दरम्यान, महत्त्वाच्या नेत्यांना येत असलेल्या धमक्यांमुळे राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली होती. मात्र, आता अखेर या आरोपी इसम जेरबंद झाला आहे.
आपण अभिनेत्री कंगना राणावत हिचा चाहता असून तिच्यापासून लांब राहण्याची धमकी या इसमाने संजय राऊतांना दिली होती. याबाबत संजय राऊत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर, पोलिसांकडून कोलकात्यातील या इसमाला शोधण्यात यश आले. मात्र, आरोपीच्या वकिलाने या दावा पूर्णपणे फेटाळून लावला आहे. न्यायालयाने मात्र या आरोपी इसमाचा अर्ज फेटाळून लावला असून आरोपीला ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.