मुखवट्याचे कारखाने… सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेकडून भाजपवर टीकास्त्र
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/uddhav-thackeray-and-devendra-fadnavis.jpg)
मुंबई | शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीका केली आहे. भाजपाच्या चेहऱ्यावरचे मुखवटे संपता संपत नाहीत, असं म्हणत शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. तसंच शिवसेनेनं 2014 मध्ये चेहरा लपवलेला नव्हता. शिवसेना उजळ माथ्यानं वावरत होती. मुखवट्याचे कारखाने भाजपकडेच होते, असा घणाघातही सामनाच्या मुखपत्रातून भाजपवर केला.
काही दिवसांपूर्वी 2014 मध्ये सत्तास्थापनेसाठी शिवसेनेनं काँग्रेसशी संपर्क साधला होता, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता.
त्यावर भाजपाने शिवसेनेवर निशाणा साधला होता आणि आता भाजपच्या टीकेला शिवसेनेनं अग्रलेखाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याचा दाखला देत भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला अशी प्रतिक्रिया दिली होती.
2014 साली अशा प्रस्तावांना कागदाच्या चुरगळलेल्या कपटय़ाचीही किंमत नव्हती. याचा अभ्यास फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला तर स्वतःच्याच चेहऱ्यावरील मुखवटे खाजवत बसण्याची वेळ त्यांच्यावर येणार नाही, असं सडेतोड प्रत्युत्तर शिवसेनेनं भाजपला दिलं आहे.