मुंबईतील दुकानदारांना आता नियमित वेळेप्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी
![Petition challenging Mumbai ward reorganization rejected by High Court! Penalties to the petitioners](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/BMC_201707384.jpg)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात केंद्र सरकारकडून बऱ्याच प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत अनेक निर्बंध शिथील केले आहेत. दरम्यान बृह्नमुंबई महानगरपालिकेने सुधारित नियमावली जाहीर केली असून मुंबईतील दुकानदारांना आता नियमित वेळेप्रमाणे दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली असून यासंबंधी आदेश मुंबई महापालिकेकडून जारी करण्यात आला आहे. पण यावेळी काही अटींचा उल्लेख करण्यात आला आहे.
आदेशात नमूद केल्याप्रमाणे मुंबईतील सर्व मार्केट, मार्केट परिसर, दुकाने पूर्ण वेळ सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली असून यातून मॉल आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सला वगळण्यात आले आहे. मुंबई महापालिकेने यावेळी काही अटींचा उल्लेख केला आहे. त्यानुसार, याआधी राज्य सरकारने लावलेला सम-विषयचा नियम कायम ठेवला आहे. रस्ते, गल्ली, परिसरात असणारी रस्त्याच्या एका बाजूची दुकाने पूर्ण दिवस नियमित वेळेप्रमाणे सुरु राहतील. तर दुसऱ्या दिवशी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूची दुकाने उघडी असतील.
नियमांचं काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी मार्केट तसेच दुकान मालकांनी सहभागी होऊन योग्य ती व्यवस्था करावी, तसेच सोशल डिस्टन्सिंग आणि वाहतुकीची व्यवस्था करावी, असे महापालिकेच्या आदेशात सांगण्यात आले आहे.