मुंबईकरांना सॅनिटायझर आणि मास्क मोफत वाटणार : पालकमंत्री
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/Aslam-Shaikh.jpg)
मुंबई | मुंबईमध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत त्यामुळे मुंबईकरांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. तसंच बाजारामध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा तुटवडा आहे. अशामध्ये सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकार मुंबईकरांना सॅनिटायझर आणि मास्क मोफत वाटणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री आणि काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना अस्लम शेख यांनी ही माहिती दिली. मुंबईतील शाळा, कॉलेज, रेल्वे स्टेशनवर मास्क आणि सॅनिटायझर मोफत वाटणार असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले. जगभरात कोरोना विषाणू झपाट्याने पसरत आहे. मुंबईतही मोठ्या प्रमाणात लोकं बाहेरून येत असतात. त्यामुळे सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. यासाठी मुंबईतील सीएसएमटी चर्चगेट स्टेशन, शाळा, कॉलेजबाहेर सेनेटायझर आणि मास्क मोफत देण्यात येणार असल्याचे अस्लम शेख यांनी सांगितले.
तसंच, मुंबईमध्ये सेनिटायझर आणि मास्कची काळ्या बाजारात विक्री केली जात आहे. यासंदर्भात बोलताना अस्लम शेख यांनी सेनिटायझर आणि मास्कचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचे १४ रुग्ण आढळले आहेत. यामधील एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक आहे. तर इतर सर्वांची प्रकृती चांगली असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले आहे.