‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश
![8 hours duty of women police; Big decision of the state government](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/udhav.jpg)
मुंबई – ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोना संसर्गाचा वेग रोखण्यात यश आल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या, असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोरोना संसर्ग रोखण्यात आपण काही प्रमाणात यशस्वी झालो असून डिसेंबरमध्येही ही मोहीम परिणामकारकपणे राबविण्याचे नियोजन करा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी प्रशासनास दिल्या. दिवाळीनंतर पुढचे 15 दिवस जागरुकतेचे आहे. त्यादृष्टीने सावधानता बाळगा आणि मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, हात वारंवार धुणे या नियमांचे पालन नागरिक करतील हे काटेकोरपणे पाहा, असेही ते म्हणाले.
हे वर्ल्ड वॉर आहे असे मी मार्च महिन्यात म्हणालो होतो, इतक्या महिन्यांमध्ये आपण हत्यार नसतानासुद्धा विषाणूवर काबू मिळविण्यासाठी लढलो आणि आपल्याला यश येत आहे असे दिसते. या विषाणूचा जेव्हा चंचूप्रवेश झाला तेव्हा आपण लॉकडाऊन केले आणि आता हळूहळू सर्व खुले करू लागलो आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
सुरुवातीला शहरात असलेला संसर्ग आता राज्यभर सर्वत्र पसरलाय. सुरुवातीच्या काळात विषाणूचा प्रसार मर्यादित ठिकाणी होता, मात्र आता ग्रामीण भागातसुद्धा रुग्ण सापडत आहेत. या सर्व कालावधीत उन्हाळा आणि पावसाळ्यात मोसमी आजार आढळले नाहीत, कारण आपण आरोग्यविषयक खबरदारी घेतली. विशेषत: ह्रदयविकार, न्यूमोनिया, अस्थमा, फ्ल्यू यासारख्या रुग्णांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे, असंही ते म्हणाले.