माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज घेणार राज्यपालांची भेट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/koshari.jpg)
मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे शिवसैनिकांकडून मारहाण झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज (१५ सप्टेंबर)राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी १२ वाजता ते राजभवनावर जाऊन भेट घेणार आहेत. तसेच, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले यांनीही शर्मा यांची भेट घेतली होती.
मदन शर्मा हे निवृत्त सैनिक असल्यामुळे त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीचा मुद्दा राष्ट्रीय स्तरावरही चांगलाच गाजला होता. भाजप पक्षाकडून आणि इतर अनेक स्तरांतून याप्रकरणी कठोर कारवाई व्हावी, ही मागणी केली जात होती. याशिवाय, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी दुरध्वनीवरून मदन शर्मा यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. माजी सैनिकाला अशाप्रकारे मारहाण होणे, खेदजनक असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच भविष्यात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यामुळे या भेटीत काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दोन दिवसांपूर्वीच अभिनेत्री कंगना हिने राज्यपालांची भेट घेतली होती. शिवसेनेसोबतच्या वादानंतर मुंबई महानगरपालिकेने कंगना हिच्या पाली हिल येथील अनधिकृत कार्यालयावर कारवाई केली होती. याविरोधात दाद मागण्यासाठी कंगना राणौत राज्यपालांना भेटली होती. यावेळी तिने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती. जेणेकरून देशातील नागरिकांचा विशेषत: तरुण मुलींचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत होईल, असे कंगनाने म्हटले होते.