महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे निसर्ग चक्रीवादळ, हवामान खात्याने फोटो केला प्रसिद्ध
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/06/Mansoon.png)
मुंबई | कोरोना व्हायरसशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आता आणखी संकट उभे ठाकले आहे. अरबी समुद्रात आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले आहे. निसर्ग असं या चक्रीवादळाला नाव देण्यात आले आहे. येत्या 48 तासात ते महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्र किनारी भागावर धडकणार आहे.
बंगालच्या उपसागरातील ‘अम्फन’ चक्रीवादळाने ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये धुडगूस घातला होता. या चक्रीवादळानंतर आता महाराष्ट्र आणि गुजरातसमोर आणखी एक वादळाने डोकं वर काढलं आहे. दक्षिण पूर्व अरबी समुद्र आणि लक्षद्वीप बेटांच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. या क्षेत्रातील वातावरण पुढील 24 तासात बिघडण्याची चिन्ह आहे. यातून चक्रीवादळात रुपांतर होणार आहे. भारतीय हवामान खात्याने या चक्रीवादळाला निसर्ग असे नाव दिले आहे.या चक्रीवादळाची पुढील 48 तासांत तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. वायव्य दिशेकडे वाटचाल करीत हे वादळ 3 जूनपर्यंत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर धडक देईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीवर 2 ते 4 जून दरम्यान मोठ्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. या चक्रीवादळामुळे मुंबईसह मध्य महाराष्ट्रातही जोरदार पाऊस पडणार आहे.